Header Ads

जत पोलीसांची मोठी कारवाई : रोहीत हिप्परकर टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार.

 जत पोलीसांची मोठी कारवाई : रोहीत हिप्परकर टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार.

--------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

--------------------------------

जत : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जत पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत रोहीत हिप्परकर टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Jat Police Station हद्दीतील गुन्हेगार रोहीत विष्णु हिप्परकर व त्याच्या टोळीविरुद्ध करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार Sandeep Ghuge, पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपारीचा आदेश पारित केला आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहीत विष्णु हिप्परकर (वय २१), सार्थक तानाजी हिप्परकर (वय २४), अक्षय ऊर्फ खंडू बाबासो हिप्परकर (वय २२) आणि मंगेश ऊर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर (वय २८, सर्व रा. सिंगनहळ्ळी, ता. जत, जि. सांगली) यांचा समावेश आहे.

या टोळीविरुद्ध २०२४ व २०२५ मध्ये अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरीने मालमत्ता हिसकावणे तसेच जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर टोळी कायदा न जुमानणारी असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. चौकशीअंती आणि सर्व अहवालांचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी सुनावणी घेऊन तडीपारीचा आदेश दिला.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संदीप कोळेकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

आगामी सण-उत्सव काळात गुन्हेगारी टोळ्यांवर कडक नजर ठेवून अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.