Header Ads

घोडेश्वर मंदिर परिसर झाला चकाचक! मुरगूडच्या युवकांकडून चार ट्रॉली कचरा संकलित; शेकडो दारूच्या बाटल्यांचीही केली विल्हेवाट

 घोडेश्वर मंदिर परिसर झाला चकाचक!

मुरगूडच्या युवकांकडून चार ट्रॉली कचरा संकलित; शेकडो दारूच्या बाटल्यांचीही केली विल्हेवाट.




कुरुकली (ता. कागल) येथील घोडेश्वर देवालयाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यात्रेदरम्यान भाविक आणि विक्रेत्यांकडून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. ही बाब लक्षात घेऊन मुरगूड, हळदवडे आणि कुरुकली येथील युवकांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. पहाटे पाच वाजल्यापासून तब्बल पाच तास श्रमदान करत युवकांनी मंदिर परिसर चकाचक केला.


युवकांनी पहाटे एकत्र येत खराटा, खोरे आणि घमेलीच्या साहाय्याने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. मंदिरासमोरील परिसर, दोन्ही बाजू, भक्तनिवास परिसर, बेनिक्रे गावाकडे जाणारा रस्ता, मंदिराच्या पाठीमागील डोंगर परिसर, सुरुपलीकडे जाणारा रस्ता तसेच कुरुकलीकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेदरम्यान जवळपास चार ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला.


विशेष म्हणजे, परिसरात टाकलेल्या सुमारे तीनशे ते साडेतीनशे दारूच्या रिकाम्या बाटल्याही युवकांनी गोळा केल्या. संकलित केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमासाठी कुरुकली ग्रामपंचायतीने कचरा भरण्यासाठी ट्रॉली आणि अल्पोपहाराची सोय उपलब्ध करून दिली.

या स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, सोमनाथ यरनाळकर, ओंकार पोतदार, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, अमर सुतार, प्रफुल्ल कांबळे, अमोल मेटकर, संकेत शहा, प्रकाश परिशवाड, रघुनाथ बोडके, अक्षय पोतदार, रणजीत मोहिते, आनंदा मोरे, नामदेव भराडे, एकनाथ भराडे,संभाजी भराडे

दीपक कांबळे, सुनील कांबळे, गिरीश पाटील, अरुण पाटील, भरत बेलवलेकर , समर्थ यरनाळकर हे सहभागी होते

युवकांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे घोडेश्वर मंदिर परिसर स्वच्छ झाला असून, धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.