मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद! वेदांत बंडगर खून प्रकरणात सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद! वेदांत बंडगर खून प्रकरणात सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई
चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा; खंडेराजुरी–गुंडेवाडी रस्त्यावर आवळल्या मुसक्या!
सांगली | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगली शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात १४ वर्षीय वेदांत बंडगर याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार आरोपी विशाल बिरुदेव चौगुले (वय ३०, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अखेर जेरबंद केले. खून प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई सुरू असताना फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे.
नेमकी कारवाई कशी झाली?
११ जून २०२६ रोजी सायंकाळी स्टेट बँक कॉलनीतील बाळू बंडगर यांच्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या वेदांतवर पिस्तुलातून गोळी झाडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश गडदे व त्याच्या साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणातील विशाल चौगुले हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत विशाल चौगुले हा खंडेराजुरी गावातून गुंडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि संशयिताला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वेदांत बंडगर खून प्रकरणातील सहभागाबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
आधी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप; आता पुन्हा खून प्रकरणात अटक!
पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल चौगुले हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या शिक्षेविरोधात न्यायालयात अपील केल्याने तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्यानंतर वेदांत बंडगर खून प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, तो फरार होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे करीत आहेत.
सांगली LCB च्या या कारवाईमुळे वेदांत बंडगर खून प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
कारवाईचे नेतृत्व: पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments: