रेंदाळच्या गायरान जमिनीवर आता ग्रामपंचायतीची नजर; अवैध उत्खननाला बसणार आळा!
रेदांळच्या गायरानावर आता ग्रामपंचायतीची नजर; अवैध उत्खननाला बसणार आळा!
गायरान परिसरात वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय; खनिज उत्खननावर राहणार करडी नजर.
सचिन कुंभार
रेंदाळ प्रतिनिधी
9021281100
*गायरान परिसरात वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय; खनिज उत्खननावर राहणार करडी नजर*
रेंदाळ, ता. हातकणंगले : रेंदाळ येथील गायरान जमिनीवरील अवैध उत्खनन आणि अनधिकृत व्यवसायांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गायरान परिसरात वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे परिसरातील हालचालींवर ग्रामपंचायतीची करडी नजर राहणार आहे.
गावाच्या दक्षिण बाजूस महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत सुमारे दोनशे एकर गायरान जमीन आहे. या परिसरात काही ठिकाणी कालव्याचे खोदकाम करण्यात आले असून, उत्खननामुळे परिसराचे स्वरूप बदलत आहे. खोदकामातून बाहेर पडणारी माती, खडी आणि दगड यांमुळे गायरान जमिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, नियमबाह्य गौण खनिज उत्खननाच्या प्रकारांमुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काही दिवसांपूर्वी अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी गायरान परिसराला भेट देऊन तेथील उत्खननाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी बेकायदेशीर उत्खननाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.
गायरान जमिनीवर अतिक्रमण किंवा नियमबाह्य उत्खनन होऊ नये, तसेच भविष्यातील गरजांसाठी ही जमीन सुरक्षित राहावी, या उद्देशाने संपूर्ण परिसरात वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुरावे उपलब्ध होणे शक्य होणार आहे.
*गायरान जमिनीचे संरक्षण ही काळाची गरज*
गायरान जमीन ही गावाच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असून, तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. भविष्यात गावाच्या विविध विकासकामांसाठी आणि सार्वजनिक गरजांसाठी या जमिनीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण, अवैध उत्खनन आणि अनधिकृत वापर रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याबाबत सरपंच सुप्रिया पाटील यांनी माहिती देताना, गायरान जमिनीवर होणाऱ्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
गायरान जमिनीचे संरक्षण आणि अवैध उत्खननाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलामुळे रेंदाळ परिसरातील सार्वजनिक जमिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

No comments: