Header Ads

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी ३९ लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

 रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी ३९ लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

---------------------------------

मिरज प्रतिनिधी 

राजु कदम.

---------------------------------

बनावट जॉइनिंग लेटर देऊन अनेकांना गंडा; एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट जॉइनिंग लेटर तयार करून तब्बल १ कोटी ३९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शितलनाथ श्रीधर चौगुले (वय ४१, व्यवसाय – मेडिकल, रा. शनिवार पेठ, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय हावळे (रा. मांजरी), सिकंदर बसर्गी (रा. नागराळ, ता. बबलेश्वर, जि. विजापूर), मंजुनाथ नाटेकर (रा. तांबा), अजित सिंग उर्फ अभिजीत कुमार (रा. नोएडा, दिल्ली) आणि सुधीर सिंग (रा. दिल्ली) यांच्याविरुद्ध बीएनएस कलम 318(4), 336(2)(3), 340(1), 341(2), 342(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२३ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत गुलमोहर कॉलनी, एमआयडीसी कुपवाड येथे आरोपींनी स्वतःला रेल्वे विभागातील अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांच्या ओळखीतील लोकांना विश्वासात घेतले. रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट रेल्वे जॉइनिंग लेटर तयार करून त्यावर बनावट शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवले.

या माध्यमातून आरोपींनी विविध व्यक्तींना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत आरटीजीएस, यूपीआय व रोख स्वरूपात १ कोटी २४ लाख ३० हजार रुपये घेतले. तसेच आरोपी अजित सिंग उर्फ अभिजीत कुमार याने रेल्वे विभागात औषध पुरवठ्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणखी १५ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात आरोपींना देण्यात आलेल्या रकमेपैकी उदय हावळे यांना २१ लाख ६० हजार, सिकंदर बसर्गी यांना १० लाख, मंजुनाथ नाटेकर यांना ७ लाख ९३ हजार, अजित सिंग उर्फ अभिजीत कुमार यांना ६३ लाख आणि सुधीर सिंग यांना ३६ लाख ७७ हजार रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी १३ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.