अवैध पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
अवैध पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
-------------------------------
सांगली प्रतिनिधी :राजु जाधव
--------------------------------
विनापरवाना अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील एका आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगलीच्या पथकाने अटक केली. या कारवाईत ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संभाजी हणमंत नलवडे (वय ३३, रा. एच.पी. गॅस गोडावूनजवळ, संख, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२६ नोंद असून त्याच्यावर आर्म अॅक्ट कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते.
या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संख ते अंकलगी रोडवरून संख तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कट्ट्यावर एक इसम विनापरवाना पिस्टल घेऊन बसला आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल आणि जिन्सच्या खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली.
सदर पिस्टल व काडतुसे बाळगण्याचा कोणताही परवाना आरोपीकडे नसल्याने पोलिसांनी ते जप्त केले. जप्त मुद्देमालामध्ये ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व ६०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे असा एकूण ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल मिरज येथील राहुल माने याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोहेकॉ आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अनंत कुडाळकर, शिवाजी सिद, रोहन घस्ते तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील व अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

No comments: