करवीर-पन्हाळा परिसरात पाणी मोटर चोरी करणारी टोळी जेरबंद; ३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
करवीर-पन्हाळा परिसरात पाणी मोटर चोरी करणारी टोळी जेरबंद; ३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
२१ चोरीच्या घटनांचा उलगडा; ४ आरोपी अटकेत.
करवीर, कळे आणि पन्हाळा पोलीस ठाणे हद्दीत नदीकाठ व विहिरीवरील पाणी उपसा मोटरी चोरी करणाऱ्या टोळीला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वडगणे फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. MH-12-DS-9886) अडवून तपासणी केली असता गाडीतून तीन पाणी मोटरी आढळून आल्या. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनिल सुभाष जाधव (वय २८, रा. आळते, ता. तासगाव), सुरज बाळू लॉखडे (वय २६, रा. रुकडी, ता. हातकणंगले), सुरज संपत गुजले (वय २९, रा. रेणावी, ता. खानापूर) आणि हर्षद विकास पाटोळे (वय २५, रा. रेणावी, ता. खानापूर) यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी गेल्या दोन ते तीन महिन्यांत करवीर, पन्हाळा व कळे परिसरातील कुंभी व कासारी नदीकाठ तसेच विहिरीलगत बसविण्यात आलेल्या तब्बल २१ पाणी मोटरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी रात्रीच्या वेळी मोटरी चोरी करून त्या मोटरसायकलच्या सहाय्याने रस्त्यावर आणत व इंडिका कारमधून विक्रीस नेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून २० पाणी मोटरी, गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, हिरो स्प्लेंडर मोटरसायकल तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मोटरी किर्लोस्करवाडी (ता. पलूस, जि. सांगली) येथून हस्तगत करण्यात आल्या.
या प्रकरणी करवीर, पन्हाळा व कळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या पाणी मोटर चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

No comments: