उदे गं आई उदे'च्या जयघोषात कौलवची रेणुका देवी आंबील यात्रा संपन्न; भंडाऱ्याच्या उधळणीने परिसर सुवर्णमयी.
उदे गं आई उदे'च्या जयघोषात कौलवची रेणुका देवी आंबील यात्रा संपन्न; भंडाऱ्याच्या उधळणीने परिसर सुवर्णमयी.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
राधानगरी तालुक्यातील कौलव येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची पारंपारिक आंबील यात्रा मोठ्या अपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. हलगीचा कडकडाट, भंडाऱ्याची उधळण आणि 'उदे गं आई उदे'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या यात्रेसाठी राधानगरी आणि कारवीर तालुक्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले.
भक्ती आणि परंपरेचा संगम
चिकोडी (कर्नाटक) येथील सौंदलगा येथील भंडारा यात्रा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कौलवच्या रेणुका देवीची ही भव्य यात्रा भरते. या परंपरेला अनेक वर्षांचा इतिहास असून, परिसरातील गावांचे या यात्रेशी अतूट नाते आहे. सकाळी यात्रेचा मुख्य सोहळा 'कोतवाल घोड्या'च्या अश्वासह सुरू झाला. सजवलेल्या अश्वाच्या अग्रभागी सुवासिनींनी काढलेली भव्य 'सवाशण' (सभेला) आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपरिक वेशभूषेतील सुवासिनी आणि डोक्यावर कळस घेतलेल्या महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा मंदिर परिसरात दाखल झाला.
भाविकांची अलोट गर्दी
या यात्रेसाठी केवळ कौलवच नव्हे तर घोटवडे, शिरसे, बर्गेवाडी, भोपळवाडी, आमजाई वरवडे यांसह कारवीर तालुक्यातील अनेक गावांतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कितेक किलोमीटर अंतरावरून आलेल्या भाविकांनी रांगा लावून देवीची ओटी भरली आणि नैवेद्य अर्पण केला. विशेषतः आंबील नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळाली.
भंडाऱ्याची उधळण अन् हलगीचा ठेका
दुपारच्या सुमारास यात्रेने मुख्य स्वरूप धारण केले. हलगीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकताना दिसत होती, तर भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे मंदिर आणि आसपासचा परिसर पूर्णपणे सुवर्णमयी झाला होता. भाविकांच्या भक्तीने आणि उत्साहाने यात्रेला एक वेगळेच चैतन्य प्राप्त झाले होते.
यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी यात्रा कमिटी, चंद्रकांत दादा युवा फाउंडेशन ग्रामपंचायत कौलव ग्रामस्थ आणि यांनी विशेष परिश्रम घेतले. कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आणि मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

No comments: