Header Ads

एमपीडीए कायद्यांतर्गत सुशांत वायदंडे यास एक वर्षासाठी स्थानबद्ध.

 एमपीडीए कायद्यांतर्गत सुशांत वायदंडे यास एक वर्षासाठी स्थानबद्ध.

-----------------------------------

सांगली प्रतिनिधी 

राजू कदम 

------------------------------------

विटा, दि. ४ मार्च २०२६ : विटा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत ऊर्फ हरी दिनकर वायदंडे (वय २४, रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली) यास महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज अ‍ॅक्ट (एमपीडीए) कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. हा आदेश जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी पारित केला.

सुशांत वायदंडे याच्याविरुद्ध २०२० ते २०२५ या कालावधीत खुनाचा प्रयत्न, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग, हद्दपार कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश, संगनमताने घातक शस्त्राने दुखापत करणे, धमकी व शिवीगाळ अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने स्थानबद्धीची कारवाई करण्यात आली.

सदर प्रस्ताव प्रभारी अधिकारी, विटा पोलीस ठाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा उपविभाग यांच्यामार्फत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची शिफारस करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला होता.

चालू वर्षातील ही दुसरी एमपीडीए कारवाई असून, यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. पुढेही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक संजीव इगडे, धनंजय फडतरे तसेच विटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली.

No comments:

Powered by Blogger.