सराफांनीही चोरीच्या घटनांबाबत सतर्क राहावे – जिल्हा पोलिसप्रमुख योगेश कुमार गुप्ता.
सराफांनीही चोरीच्या घटनांबाबत सतर्क राहावे – जिल्हा पोलिसप्रमुख योगेश कुमार गुप्ता.
--------------------------------
कोल्हापूर, प्रतिनिधी
---------------------------------
जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सराफ व्यावसायिकांनीही दक्षता घेतली तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे शक्य होईल, असे मत जिल्हा पोलिसप्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची पहिली बैठक गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी गुप्ता म्हणाले की, सराफ व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, परस्परांमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून संशयित हालचालींची माहिती देणे यांसारख्या उपाययोजना केल्यास गुन्हे रोखण्यास मदत होईल. तसेच जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावरही दक्षता समित्या स्थापन करून दर तीन महिन्यांनी बैठक घेणे आवश्यक आहे. अशा बैठकीत संवादातून समस्या मांडल्या जाऊन त्यावर प्रभावी उपायही निघू शकतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हास्तरीय दक्षता समितीला यावेळी अधिकृत मान्यता देण्यात आली. या समितीत भरत ओसवाल, राजेश राठोड, माणिक जैन, विजय हावळ, जितेंद्र राठोड, प्रीतम ओसवाल, शिवाजी पाटील (कोल्हापूर), संजय मालंडकर (गारगोटी), संजय माने (हुपरी), युवराज शहा (जयसिंगपूर), श्रीनिवास वेर्णेकर (गडहिंग्लज), संदीप पोतदार (वारणा कोडोली), कुमार दळवी (करवीर), सुभाष पोतदार (इचलकरंजी) आणि अभिजित लाड (आजरा) यांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी राज्यस्तरीय सदस्य भरत ओसवाल यांनी सराफ व्यावसायिक आणि पोलिस प्रशासन यांच्यात ही समिती कशाप्रकारे दुवा साधणार आहे याची माहिती दिली. महाराष्ट्र हे अशा प्रकारची समिती असलेले देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments: