Header Ads

७/१२ वर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी व उपसरपंच रंगेहात जेरबंद.

 ७/१२ वर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी व उपसरपंच रंगेहात जेरबंद.

------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

------------------------------------

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव लावून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी व उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. ५ मार्च) करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे करण्यात आली.

इरफान दिलावर सनदी (वय ४१, पद – ग्राम महसूल अधिकारी, सज्जा शिंगणापूर) व दीपक सदाशिव कांबळे (वय ४३, पद – उपसरपंच, शिंगणापूर ग्रामपंचायत) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार (वय ३४) यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा पत्रिकेवर वडिलांचे नाव नोंद करण्यासाठी आरोपी ग्राम महसूल अधिकारी इरफान सनदी यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दि. ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता सनदी यांनी स्वतःसाठी तसेच उपसरपंच दीपक कांबळे यांच्या मार्फत १० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. नंतर तडजोडीअंती ५ हजार रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला.

यानुसार दि. ५ मार्च रोजी शिंगणापूर तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी सनदी यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ५ हजार रुपयांची लाच रक्कम उपसरपंच दीपक कांबळे यांना दिली. कांबळे यांनी ती रक्कम कार्यालयाशेजारील खोलीतील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितली. पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ५ हजार रुपयांची लाच रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या शिंगणापूर व कोल्हापूर येथील घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ७(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या कारवाईवर पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांचे पर्यवेक्षण होते.

No comments:

Powered by Blogger.