जुनी पेन्शन हक्कासाठी कोल्हापुरात संताप; शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 'मुंडन' आंदोलन
जुनी पेन्शन हक्कासाठी कोल्हापुरात संताप; शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 'मुंडन' आंदोलन.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
----------------------------------
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या, परंतु नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारी २०२६ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा आज (१० मार्च) १२ वा दिवस होता. या संघर्षाची धार धारदार करत आज दुपारी ३ वाजता आंदोलकांनी सामूहिक 'मुंडन' करून सरकारचा जाहीर निषेध केला.
या आंदोलनात सुदेश जाधव, प्रकाश स्वामी, बाळासो संकपाळ, बळीराम पाटील, कुलदीप पाटील, शंकर पाटील, निवास कळके, यशवंत तळेकर, विकास पाटील आणि सुभाष पाटील या कर्मचाऱ्यांनी मुंडन करून आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये:
राजकीय व शैक्षणिक नेतृत्व: माजी आमदार भगवानराव साळुंखे, दादासाहेब लाड (शिक्षक भारती), सर्जेराव लाड (शैक्षणिक व्यासपीठ), राहुल पवार (मुख्याध्यापक संघ).
विविध संघटना: उदय पाटील (शिक्षक परिषद), विजय जाधव (काँग्रेस शिक्षक सेल), एम.एन. पाटील (शिक्षक सेना).
सहकारी संस्था: जयसिंग पवार, शिवाजीराव लोंढे, शांताराम तौंदकर, मदन निकम, बी.के. मोरे यांसारख्या पतपेढी व कोजिमाशीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी बोलताना नेत्यांनी इशारा दिला की, जोपर्यंत शासन जुन्या पेन्शनचा ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. शेकडो पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.

No comments: