अंबप येथे मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार; पोलिसांच्या उशिरा येण्याने संताप
अंबप येथे मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार; पोलिसांच्या उशिरा येण्याने संताप.
-------------------
शशिकांत कुंभार.
-------------------
अंबप फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात अंबप येथील 38 वर्षीय सर्जेराव महादेव डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर सर्जेराव डोंगरे हे महाप्रसाद घेऊन पायी अंबप गावाकडे जात असताना, अंबपकडे जाणाऱ्या भरधाव मोटरसायकल (क्र. MH 11 BU 5372) ने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत डोंगरे रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळूनही पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी किर्लोस्करवाडी येथील मोटरसायकलस्वार अब्दुल रहीमान पठाण याच्याविरुद्ध पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments: