एकाच रात्रीत 6 घरांवर डल्ला; गुडाळ गावात धाडसी घरफोड्या, भीतीचं सावट!
एकाच रात्रीत 6 घरांवर डल्ला; गुडाळ गावात धाडसी घरफोड्या, भीतीचं सावट!
------------------------------------
राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे.
---------------------------------------
राधानगरी तालुक्यातील गुडाळ गावात अज्ञात चोरट्याने एका रात्रीत तब्बल 6 घरांवर डल्ला मारत धाडसी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय माने (पोलीस), आशिष पाटील (पत्रकार), प्रकाश पाटील, बाबुराव चौगले, प्रकाश माळवी आणि एस. बी. पाटील यांच्या घरांमध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. संबंधित कुटुंबे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने बंद घरांना लक्ष्य केले.
घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरट्याने कडी-कोयंडे तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटे उचकून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम लंपास करण्यात आली. सकाळी घरमालक परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून प्राथमिक तपासात ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: