Header Ads

कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेचा विनयभंग; खासगी सावकाराला अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

 कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेचा विनयभंग; खासगी सावकाराला अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी.

-------------------------

शशिकांत कुंभार.

--------------------------

गांधीनगर, ता. २१ :

कर्जाच्या वसुलीच्या नावाखाली महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकरणात खासगी सावकाराला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील संशयित अमित कृष्णात सावंत (वय ३५, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला एका सामाजिक संस्थेत कार्यरत असून तिने २०२३ साली आर्थिक अडचणीमुळे आरोपीकडून दोन लाख रुपये घेतले होते. सुरुवातीला व्याजाची परतफेड नियमित केली जात होती. मात्र नंतर आर्थिक अडचण वाढल्याने परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेवर अश्लील मागण्या केल्याचे समोर आले आहे.

महिला एकटी असताना तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार महिलेचा छळ केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेने व्याजासह सुमारे २ लाख १० हजार रुपये परत केले असतानाही उर्वरित रकमेच्या कारणावरून हा छळ सुरूच होता.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेच्या जावयाने जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोपीने त्यालाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बदनामीच्या भीतीने काही काळ गप्प राहिलेल्या महिलेने अखेरीस धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली.

गांधीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.