Header Ads

संभाजीनगर एसटी चालक-वाहकांनी सहा लाखांचा ऐवज केला परत असा हा प्रामाणिकपणा.

संभाजीनगर एसटी चालक-वाहकांनी सहा लाखांचा ऐवज केला परत असा हा प्रामाणिकपणा.

संभाजीनगर येथील एसटी आगारातील चालक व वाहकांच्या प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण नुकतेच समोर आले आहे. प्रवाशाची हरवलेली सुमारे सहा लाख रुपयांची किंमत असलेली पर्स त्यांनी प्रामाणिकपणे परत करून विश्वास जपला.

संभाजीनगर–पुणे मार्गावरील एसटी (क्रमांक एमएच 14 बीटी 4619) पुण्याकडे जात असताना वैष्णवी शुभम निकम व त्यांच्या सासू या दोघी सातारा बसस्थानकावर उतरल्या. त्यानंतर बस पुढे निघाली असता, वाहक रविराज कांबळे यांच्या लक्षात आले की प्रवाशाची पर्स सीटवरच राहिली आहे.

सदर पर्स आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज असल्याचे आढळून आले. काही वेळाने वैष्णवी निकम यांच्या लक्षात पर्स हरवल्याचे येताच त्यांनी आपल्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी वाहक कांबळे यांनी पर्स सुरक्षित असल्याची खात्री देत, “काळजी करू नका, तुमचा सर्व ऐवज सुखरूप मिळेल,” असा दिलासा दिला.

यानंतर वैष्णवी निकम यांनी आपला भाऊ पुण्यात येऊन पर्स घेईल, अशी व्यवस्था केली. बस पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्या भावाकडे वाहक रविराज कांबळे यांनी प्रामाणिकपणे सर्व ऐवज सुपूर्द केला.

दुसऱ्या दिवशी ही बस सातारा बसस्थानकावर आल्यानंतर वैष्णवी निकम व त्यांचे सासरे रमेश निकम यांनी चालक बाबासाहेब सिताराम पाटील व वाहक रविराज कांबळे यांचा पेढे देऊन सत्कार केला.

यावेळी रमेश निकम यांनी, “एसटी ही विश्वासार्ह सेवा असून चालक-वाहकांनी सहा लाखांचा ऐवज परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला,” असे सांगितले. त्यांनी एसटी प्रशासन व संबंधित कर्मचाऱ्यांचे आभार मानले

No comments:

Powered by Blogger.