Header Ads

सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन कक्ष तीन महिन्यांपासून बंद; आरोग्य सभापती शितल यादव यांचा संताप

 सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन कक्ष तीन महिन्यांपासून बंद; आरोग्य सभापती शितल यादव यांचा संताप

------------------------------------

महेश कांबळे 

हातकणंगले तालुका प्रतिनिधी.

------------------------------------

कुंभोज, प्रतिनिधी : सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) कक्ष गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य सभापती शितल यादव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित कक्ष तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

सावर्डे व परिसरातील नागरिकांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, येथे विविध त्रुटींबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. याची दखल घेत आरोग्य सभापती शितल यादव यांनी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी शवविच्छेदन कक्षाला कुलूप असल्याचे आढळून आले.

शवविच्छेदन कक्ष बंद असल्यामुळे मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यासाठी नातेवाईकांना इतर ठिकाणी जावे लागत असून, त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत “आरोग्य सेवेत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा देत कक्ष तातडीने सुरू करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना यादव यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी औषध साठा, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा तसेच एकूणच आरोग्य सेवांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

या पाहणीवेळी माजी सभापती प्रवीण यादव, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.