महागाईविरोधात कोल्हापुरात रेशन बचाव समितीचा मोर्चा; मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
महागाईविरोधात कोल्हापुरात रेशन बचाव समितीचा मोर्चा; मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.
---------------------
कोल्हापूर : प्रतिनिधी .
शशिकांत कुंभार .
----------------------
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशन बचाव समितीच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गॅस दरवाढ, रेशनवरील वस्तूंचा तुटवडा आणि रेशन कार्ड रद्द करण्याच्या प्रक्रियेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचा आरोप करत मध्यम व गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण वाढल्याचे नमूद केले. गॅस सिलेंडर स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याच्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच रेशन दुकानांवर आवश्यक वस्तू नियमित मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. “मिशन सुधार” मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर रेशन कार्ड रद्द करण्याच्या प्रक्रियेबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी गॅसचा घरपोच पुरवठा, रेशनवर रॉकेल उपलब्ध करून देणे, तसेच गोडेतेल, डाळी व साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात डॉ. रवींद्र मोरे, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग सुभेदार, संदीप लाटकर, श्रीपतराव पाटील, आनंदा लादे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, दीपक शिराळे, नाना उलपे, हिदायत मनेर, सातापा शेणवी आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

No comments: