पंचगंगा नदीत तरुण बुडाला; रुईत हृदयद्रावक घटना.
पंचगंगा नदीत तरुण बुडाला; रुईत हृदयद्रावक घटना.
------------------------
हातकणंगले तालुका प्रतिनिधी.
महेश कांबळे.
-------------------------
रुई (ता. हातकणंगले), दि. 20 : उन्हाच्या तडाख्यात नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. रुई येथील पंचगंगा नदी पात्रात पोहताना 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोहीद हनीफ पठाण (वय 19, रा. रेणुका नगर, यड्राव) हा आपल्या मित्रांसह पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला होता. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास नदीतील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूस पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक आलेल्या प्रवाहामुळे तो धरणाच्या मोहरीतून पुढे वाहत गेला आणि पाण्यात बुडाला.
सोबत असलेल्या मित्रांनी तत्काळ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच मागोवा लागला नाही. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले व हुपरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशिरापर्यंत तरुणाचा शोध लागू शकला नव्हता.
घटनास्थळी तोहीदच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता, ज्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. या वेळी पोलीस पाटील नितीश तराळ, सुभाष चौगुले आदींनी मदतकार्य केले.
---------------------------

No comments: