Header Ads

गांधीनगर सिंधू मार्केट–वसाहत रस्ता तात्काळ पूर्ण करा : रिपब्लिकन सेनेचा इशारा

 .गांधीनगर सिंधू मार्केट–वसाहत रस्ता तात्काळ पूर्ण करा : रिपब्लिकन सेनेचा इशारा.

-----------------------.

संस्कार कुंभार.

-----------------------

गांधीनगर, ता. करवीर (दि. २२ एप्रिल २०२६) : गांधीनगर येथील सिंधू मार्केट ते वसाहत रुग्णालय या मार्गाच्या कामात मोठी दिरंगाई होत असून कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रखडलेल्या रस्त्याची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर तात्काळ कारवाई करावी व रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मा. गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून दीर्घकाळ रस्ता खोदून ठेवण्यात आल्यामुळे गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ग्राहकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून काही अपघातही घडले आहेत.

सणासुदीच्या काळातही रस्ता दुरुस्ती पूर्ण न झाल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्ता कामातील दिरंगाईबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, महासचिव अर्जुन कांबळे, संघटक शिवाजी कांबळे, महासचिव अर्जुन गोंधळी, सचिव संतोष कांबळे व कोषाध्यक्ष संदीप गोंधळी आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.