Header Ads

चांदेकरवाडीत विहिरीत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

 चांदेकरवाडीत विहिरीत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर.

--------------------------------------

राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे.

--------------------------------------

राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत शेतकरी लहू रामचंद्र खोत (वय ५३) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लहू खोत हे जनावरांना पाणी आणण्यासाठी पडसोळी येथील शेतात असलेल्या विहिरीवर गेले होते. पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. पोहता न येत असल्याने ते पाण्यात बुडून बेशुद्ध झाले.

ही घटना लक्षात येताच दत्तात्रय खोत यांनी आरडाओरड केली. त्यावेळी जवळच काम करत असलेले मामेभाऊ महादेव शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारून त्यांना बाहेर काढले. तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, सोळंकूर येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर पुढील तपास करत आहेत.

🟨 चौकट : कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

लहू खोत हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आजारी वडील असा परिवार आहे. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरीच असतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती आणि मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

पत्नी सविता खोत देखील शेतमजुरी करून संसाराला हातभार लावत होत्या. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कष्ट घेतले असून, एक मुलगा बारावी तर दुसरा दहावीपर्यंत शिकत आहे. लहू खोत यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जबाबदारी आता पत्नीवर येऊन पडली आहे.

No comments:

Powered by Blogger.