Header Ads

लव्ह जिहाद प्रकरणी पुलाची शिरोली बंद; आरोपी अटकेत, साथीदार फरार

लव्ह जिहाद प्रकरणी पुलाची शिरोली बंद; आरोपी अटकेत, साथीदार फरार.

कोल्हापूर, दि. 28 (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे कथित “लव्ह जिहाद” प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली असून मंगळवारी गाव बंद ठेवण्यात आला. या प्रकरणात समीर सनदे याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार शाहरूख देसाई हा अद्याप फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींकडे काही युवतींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित प्रकरणात अधिक तपास सुरू असून नेमकी संख्या आणि स्वरूपाबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर सनदे याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्याचा गैरफायदा घेत इतर युवतींनाही जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित युवतींना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणाची माहिती बाहेर आल्यानंतर गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली.

हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंदची हाक दिल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिरोली फाटा परिसरात जमले. आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याची माहिती आहे.

संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून संबंधित आरोपींचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. आमदार अशोक माने, संजय पवार व विजय देवणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली.

सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिवसभर शिरोली परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके कार्यरत आहेत.

No comments:

Powered by Blogger.