Header Ads

सूक्ष्म नियोजनातून नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष.

 सूक्ष्म नियोजनातून नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष.

------------------------------------------

मिरज-कुपवाड : प्रतिनिधी राजू कदम.

------------------------------------------

सांगली, दि. 27 : संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करून अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या. पूरस्थितीत दरवर्षी 100 हून अधिक गावे बाधित होत असल्याने पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्रा, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. घोष यांनी 2019 व 2021 मधील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने सतर्कता ठेवावी, असे सांगितले. धोकादायक इमारतींचे पंचनामे, निवारा केंद्रांची तयारी, पाणी गुणवत्तेची तपासणी, अन्नधान्य व गॅस वितरण, पशुधन संरक्षण, तसेच धरणे व पुलांची दुरुस्ती यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धोकादायक पूल तत्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नियंत्रण कक्ष, बचाव पथके, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, औषधे, रुग्णवाहिका व मदत केंद्रे सज्ज ठेवावीत. प्रत्येक गावात ‘आपदा मित्र’ तयार करून शोध व सुटका पथके तयार ठेवावीत, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पूर्वतयारीबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देत ग्रामस्तरीय आराखडे अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या. महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्रा यांनी वीज व पाणीपुरवठा यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.

बैठकीत विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेऊन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. तसेच, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने पूरस्थितीवर आधारित अभ्यासाची माहिती सादर करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.