Header Ads

ग्रामदैवताच्या देवालयातील पितळी घंटा चोरीला; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, तक्रारही नाही

 ग्रामदैवताच्या देवालयातील पितळी घंटा चोरीला; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, तक्रारही नाही.

----------------------------------

कळे : प्रतिनिधी सुनील मोळे.

-------------------------------

माळवाडी कोतोली (ता. पन्हाळा) येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा देवालयातील पितळी घंटा चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी स्वच्छतागृहातील पाण्याची टाकी चोरीला गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांची अद्याप पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आलेली नाही.

माळवाडीच्या ओढ्यालगत वसलेले श्री म्हसोबा मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते. गुरुवार, मंगळवार, अमावस्या तसेच यात्रेच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणीच चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यातील गजाला नट-बोल्टने बसवलेल्या पितळी घंटा बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे दरम्यान चोरट्यांनी काढून नेल्या. सकाळी पुजारी पूजेसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. रस्त्यावरील जिममधील सीसीटीव्ही तपासण्यात काहीच संशयास्पद आढळून न आल्याने चोरट्यांनी शेत-शिवारातून येत चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही मंदिराशेजारील स्वच्छतागृहातील पाण्याची टाकी चोरीला गेली होती. त्या वेळीच ग्रामपंचायतीने दक्षता घेतली असती, तर सद्य घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. देवस्थानाच्या सुरक्षिततेकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोपही केला जात आहे.

दरम्यान, चोरीच्या दोन्ही घटनांची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंदच न झाल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. ग्रामपंचायतीने तक्रार का दिली नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सध्या सरपंच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व्यस्त असल्याने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगली आहे.

ग्रामदैवताच्या मंदिरातील घंटाच चोरीला जाणे ही भाविकांच्या श्रद्धेला ठेच देणारी बाब असून, ग्रामपंचायतीने तातडीने पोलीसांत फिर्याद दाखल करावी व पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी माळवाडी, कोतोली व पंचक्रोशीतील नागरिकांतून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.