खाकीतील धडाडीला सलाम! विजयानंद कुंभार यांची ASI पदावर दमदार झेप....
खाकीतील धडाडीला सलाम! विजयानंद कुंभार यांची ASI पदावर दमदार झेप....
-----------------------------कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, धाडसी आणि जनसंपर्कात अग्रेसर असलेले पोलीस कर्मचारी विजयानंद कुंभार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलासह सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सन २००० मध्ये पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली. इचलकरंजी वाहतूक शाखेपासून सुरू झालेला त्यांचा सेवाप्रवास शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि सध्या कळे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेची आणि तपास कौशल्याची वेगळी छाप उमटवली.
शाहूपुरी पोलीस ठाण्यातील डीबी पथकात कार्यरत असताना विविध गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून अनेक आरोपींना अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यातही अनेक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गुन्हे उघडकीस आणण्यातील त्यांची चिकाटी आणि अचूक तपास पद्धतीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर कायम विश्वास राहिला.
सन २०२३ पासून कळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजयानंद कुंभार यांनी लोकाभिमुख पोलीस अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना परिसरातील नागरिकांचा मोठा सन्मान आणि विश्वास प्राप्त झाला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवेला मिळालेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती ही त्यांच्या मेहनतीची आणि समर्पित कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments: