सांगलीत गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; दोन टोळ्या हद्दपार.
सांगलीत गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; दोन टोळ्या हद्दपार.
-------------------------------
सांगली प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सांगली पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत दोन कुख्यात टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव टोळीला दोन वर्षांसाठी, तर ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील टोळीला तीन महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप विरसिंग जाधव (वय २३) याच्यासह ओंकार हणमंत बोडरे (वय २१) व संदीप विरसिंग जाधव (वय २४, सर्व रा. तुपारी वसाहत, पलूस) यांच्याविरोधात बलात्कार, घातक हत्याराने गंभीर दुखापत, चारचाकी व दुचाकी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत या टोळीने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
त्याचप्रमाणे ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख आकाश हणमंत पाटील (वय २४) याच्यासह स्वागत लक्ष्मण शिंदे (वय २२), अक्षय विकास मोरे (वय ३१), आशिष हणमंत पाटील (वय २४) आणि समीर अमीर खानजादे (वय २५, सर्व रा. अशोकनगर, साखराळे, ता. वाळवा) यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, गंभीर दुखापत तसेच अवैध विदेशी दारू बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. चौकशी अधिकाऱ्यांचे अहवाल, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाया आणि टोळी सदस्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन तडीपारीचे आदेश पारित केले.
गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही अशा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व अरुण पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव इगडे, ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कुंडलचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


No comments: