"अजातशत्रू नेतृत्वाला भावपूर्ण अभिवादन; कै. बाळासाहेब पाटील कौलवकर यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव"
"अजातशत्रू नेतृत्वाला भावपूर्ण अभिवादन; कै. बाळासाहेब पाटील कौलवकर यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव"
---------------------------------------शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे कै. बाळासाहेब पाटील कौलवकर यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना वक्त्यांनी त्यांचे कार्य, नेतृत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
यावेळी गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले यांनी कै. बाळासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, "समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर निस्वार्थपणे काम केले. त्यांचे सामाजिक योगदान आजही प्रेरणादायी आहे."
सदाशिवराव चरापले यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, "बाळासाहेब पाटील हे शिक्षण आणि समाजकारण क्षेत्रातील खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. राजकारणातही त्यांनी अजातशत्रू म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले होते."
मान्यवरांनी जागवल्या आठवणी
कार्यक्रमात भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, भाजप अध्यक्ष नाथाजी पाटील तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रविश पाटील कौलवकर यांनीही कै. बाळासाहेब पाटील यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवास हुजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सूत्रसंचालन संजय चरापले यांनी केले.
यावेळी भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, बंडोपंत किरुळकर, सरपंच एकनाथ कुंभार, रावसो शंकर पाटील, संतोष कातिवले, विजयबाबा महाडिक, मनोज पाटील कौलवकर, शहाजी पाटील, एम. एन. बरगे, रामचंद्र बरगे, रणजितसिंह पाटील, विलास भोपळे आदी मान्यवरांनी कै. बाळासाहेब पाटील कौलवकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास कौलव परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात कै. बाळासाहेब पाटील कौलवकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.

No comments: