सांगली एलसीबीची मोठी कारवाई; ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त.
सांगली एलसीबीची मोठी कारवाई; ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त.
-------------------------------सांगली प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सांगली व सातारा जिल्ह्यातील ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ४ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून एक आरोपी व दोन बालअपचारींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते.
१२ जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार धामणी रोडवरील पलाश बिल्डकॉम परिसरात विनानंबरची यामाहा आरएक्स-१०० मोटारसायकल घेऊन संशयितरीत्या थांबलेल्या तेजस केदार साळुंखे (वय १८, रा. कुंभारगाव, ता. कडेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर एलसीबीच्या पथकाने सांगली रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा मंदिर परिसरात छापा टाकून दोन बालअपचारींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान सांगली ग्रामीण, इस्लामपूर, आष्टा, पलूस, बोरगाव व तळबिड पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
जप्त मुद्देमाल
यामाहा आरएक्स-१००च्या ५ मोटारसायकली – किंमत ₹३ लाख
रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० – किंमत ₹१.२० लाख
हिरो स्प्लेंडर मोटारसायकल – किंमत ₹५० हजार
असा एकूण ₹४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून बालअपचारींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत.

No comments: