"मंदिरातील चांदीच्या गणपती मूर्ती चोरीचा २४ तासांत पर्दाफाश; दोन चोरटे जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस"
"मंदिरातील चांदीच्या गणपती मूर्ती चोरीचा २४ तासांत पर्दाफाश; दोन चोरटे जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस"
---------------------------------कसबा तारळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून चांदीच्या गणपतीच्या मूर्ती चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन चांदीच्या मूर्तींसह दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्याचा लोखंडी दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या दोन गणपती मूर्ती लंपास केल्या होत्या. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक नेमले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने कळंबा परिसरात सापळा रचून संदीप आनंदा जांभळे (वय ३५) व मंगेश भिकाजी कुराडे (वय ३९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३४५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन गणपती मूर्ती, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एमएच-०९-एफआर-०५३४) आणि स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एमएच-०९-डीजी-१२९५) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन गुन्ह्यांची उकल
तपासादरम्यान आरोपींकडून राधानगरी व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले. चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्याने एकूण तीन गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
एलसीबीच्या तत्पर कारवाईचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच गजानन गुरव, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बरगे, संजय देसाई, विशाल खराडे, शिवानंद मठपती आणि अमित मर्दाने यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

No comments: