Header Ads

ग्रामीण रुग्णालय कागल येथे हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त ‘मलेरिया कॉर्नर’ उपक्रम उत्साहात.

ग्रामीण रुग्णालय कागल येथे हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त ‘मलेरिया कॉर्नर’ उपक्रम उत्साहात.


---------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कागल, दि. १२ जून : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप दूरिकरण धोरण २०३० च्या अनुषंगाने दरवर्षी जून महिना ‘हिवताप प्रतिरोध महिना’ म्हणून साजरा करण्यात येतो. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर (JE), चंडीपूरा तसेच हत्तीरोग यांसारख्या किटकजन्य आजारांविषयी जनजागृती निर्माण करून नागरिकांचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या सूचनेनुसार शुक्रवार दि. १२ जून २०२६ रोजी कागल शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘मलेरिया कॉर्नर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत हिवताप व इतर किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी विविध साधने, डासअळी नियंत्रणाच्या पद्धती, गप्पी माशांचे महत्त्व तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व माहितीपर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

उपस्थित रुग्ण व नागरिकांना या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली. प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपाययोजनांविषयी उत्सुकता दर्शविली.

कागल शहराचे आरोग्य निरीक्षक श्री. आर. पी. दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश पवार व श्री. राजदीप घोडके यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. तसेच या उपक्रमासाठी मा. अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी श्री. जे. के. कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भास्कर, , डॉ. सुलभा पाटील , अधीक्षक रामचंद्र सातवेकर , प्रयोगशाळा विभाग प्रमुख कोळी साहेब तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये किटकजन्य आजारांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

No comments:

Powered by Blogger.