Header Ads

बांबवडे येथे एसटीच्या धडकेत महसूल सहाय्यक मारुती मकर ठार; पत्नी व दोन मुले जखमी.

 बांबवडे येथे एसटीच्या धडकेत महसूल सहाय्यक मारुती मकर ठार; पत्नी व दोन मुले जखमी.


मलकापूर ता. 30: 

बांबवडे टर्निंग पॉईंट (कारखाना फाटा) येथे मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शाहुवाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मारुती विठ्ठल मकर (वय ३६) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी व दोन लहान मुले जखमी झाली असून मुलगी सई हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मकर हे एमएच ०९ एफयू ५०४६ क्रमांकाच्या दुचाकीवरून पत्नी काजल, मुलगी सई (वय ४) आणि दीड वर्षांचा मुलगा समर्थ यांना उपचारासाठी बांबवडे येथे घेऊन जात होते. त्यावेळी कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी शिवाई एसटी बस (एमएच १२ झेडई ९५३४) आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली.

या अपघातात मारुती मकर यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी काजल व मुलगा समर्थ जखमी झाले असून मुलगी सईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर कोल्हापूर येथील प्रभू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारुती मकर हे गेल्या चार वर्षांपासून शाहुवाडी तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मूळचे दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील असलेल्या मकर यांची शांत, संयमी आणि मनमिळावू कर्मचारी अशी ओळख होती. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांनंतर त्यांची बदली होणार होती.

या प्रकरणी एसटी चालक किरण अशोक हेगडे (वय ३७, रा. सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला शाहुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

मारुती मकर यांच्या अकाली निधनाने शाहुवाडी तहसील कार्यालयावर शोककळा पसरली असून अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


No comments:

Powered by Blogger.