Header Ads

नेटबॉल संघटनांमध्ये वाद तीव्र; 'महाराष्ट्र नेटबॉल बचाव कोअर कमिटी'ची स्थापना

 नेटबॉल संघटनांमध्ये वाद तीव्र; 'महाराष्ट्र नेटबॉल बचाव कोअर कमिटी'ची स्थापना.

---------------------------
चंद्रपूर | प्रतिनिधी.
----------------------------

नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनची संलग्नता कथितपणे नियमबाह्य पद्धतीने रद्द करून नव्या राज्य संघटनेला मान्यता दिल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. या निर्णयामुळे १९९४ पासून कार्यरत असलेल्या अनेक जिल्हा नेटबॉल संघटनांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली असून, खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पदाधिकाऱ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे राज्यातील संलग्न जिल्हा संघटनांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत फेडरेशनच्या निर्णयाविरोधात भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा आयुक्त, धर्मादाय आयुक्त आदी सक्षम प्राधिकरणांकडे दाद मागण्याचा तसेच आवश्यक असल्यास न्यायालयात जाण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यासाठी 'महाराष्ट्र नेटबॉल बचाव कोअर कमिटी' स्थापन करण्यात आली.

बैठकीत आगामी ४४ वी सिनियर नॅशनल नेटबॉल चॅम्पियनशिप (पुरुष) २०२६-२७ साठी महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशन (गोंदिया) राज्यस्तरीय निवड स्पर्धा घेऊन महाराष्ट्राचा संघ पाठविणार असल्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. नारायण मूर्ती यांची निवड करण्यात आली, तर डॉ. शालिनी आंबटकर (जयस्वाल) यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींचा समितीत समावेश करण्यात आला. उपस्थितांनी राज्यातील नेटबॉल खेळाडू व संलग्न संघटनांचे हित जपण्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.