Header Ads

पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही!

 पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही!खा. संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कारवाई करा; व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन न्याय मिळेपर्यंत बहिष्काराचा इशारा; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

-----------------------------------------

सातारा | प्रतिनिधी : अमर इंदलकर.

--------------------------``------------

खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. संतोष पाटील यांना निवेदन सादर केले. पत्रकारांचा अवमान हा संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राच्या स्वाभिमानावर झालेला घाला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांविषयी लोकप्रतिनिधींनी अवमानकारक भाषा वापरणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा वक्तव्यांमुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते, स्वतंत्र पत्रकारितेवर दबाव येतो आणि लोकशाही मूल्यांनाही धक्का पोहोचतो. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

व्हॉईस ऑफ मीडियाने खा. संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची, पत्रकारांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागण्याची, त्यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची तसेच पत्रकारांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कठोर धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांना निर्भय आणि सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत खा. संजय दिना पाटील तसेच शिंदे गटाच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्यात येईल. शासनाने तातडीने कारवाई न केल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

निवेदन सादर करताना व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर, जिल्हा सहकार्याध्यक्ष जीवन पवार, जिल्हा सहकार्याध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा खजिनदार मोहन खुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा वाई तालुका अध्यक्ष संजय भाडळकर, सातारा तालुका अध्यक्ष संदीप माने यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.