हॉलमार्कच्या बनावट बांगड्यांद्वारे ₹10.35 लाखांची फसवणूक; पाच आरोपी जेरबंद
हॉलमार्कच्या बनावट बांगड्यांद्वारे ₹10.35 लाखांची फसवणूक; पाच आरोपी जेरबंद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सातारा शहरातील सराफ व्यावसायिक, बँका आणि फायनान्स कंपन्यांची बनावट हॉलमार्क असलेल्या पिवळ्या धातूच्या बांगड्या सोन्याच्या असल्याचा भास निर्माण करून तब्बल ₹10 लाख 35 हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून तारण ठेवलेल्या बनावट हॉलमार्क बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे परजिल्ह्यातून आरोपींना अटक केली.
या कारवाईमुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या बनावट हॉलमार्क बांगड्या पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या असून, न्यायालयाने अटक आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये उमेश शशिकांत शिंदे (मूळ रा. कोरेगाव, सध्या मुंबई), सोमनाथ भुजंगराव बाबर (सध्या सातारा) आणि सिकंदर बादशहा शेख (रा. पाचगाव, जि. कोल्हापूर) यांचा समावेश असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिक, बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांनी सोने तारण स्वीकारण्यापूर्वी दागिन्यांची आणि हॉलमार्कची अधिकृत तपासणी करूनच व्यवहार करावेत. तसेच संशयास्पद व्यवहार अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments: