सायबर फसवणुकीतील तब्बल ₹3.85 लाख पीडितांना परत; सांगली सायबर पोलिसांची प्रभावी कारवाई
सायबर फसवणुकीतील तब्बल ₹3.85 लाख पीडितांना परत; सांगली सायबर पोलिसांची प्रभावी कारवाईMRM पोर्टलद्वारे ७५ प्रकरणांतील रक्कम परताव्याची प्रक्रिया; नागरिकांना १९३० वर त्वरित तक्रार करण्याचे आव्हान.
सांगली | प्रतिनिधी
सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना दिलासा देत सांगली सायबर पोलीस ठाण्याने MRM (Money Restoration Module) पोर्टलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. जून २०२६ पासून प्राप्त झालेल्या ७५ तक्रारींमध्ये एकूण ₹4,77,887 रक्कम होल्ड करण्यात आली असून, त्यापैकी ₹3,85,365 रक्कम संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात परत जमा करण्यात आली आहे.
डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदविल्यास संशयित खात्यातील रक्कम गोठविण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ₹50 हजारांपर्यंतची होल्ड रक्कम MRM पोर्टलद्वारे परत मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या नेतृत्वाखाली सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. रक्कम होल्ड झाल्यानंतर MRM पोर्टलवर रिफंडसाठी अर्ज करून सांगली सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया जलद होऊ शकेल.

No comments: