Header Ads

फेजीवडे हायस्कूलचा आदर्श! मतदानाच्या दिवशीच विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय; जिमखाना निवडणूक बिनविरोध.

 फेजीवडे हायस्कूलचा आदर्श! मतदानाच्या दिवशीच विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय; जिमखाना निवडणूक बिनविरोध.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी तालुक्यातील फेजीवडे येथील माध्यमिक विद्यालयात यंदाची शालेय जिमखाना निवडणूक एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरली. आठवडाभर रंगलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ऐक्य आणि सामंजस्याचा आदर्श घालत सर्व पदांची निवड बिनविरोध केली. त्यामुळे शाळेत लोकशाहीचे धडे केवळ पुस्तकापुरते न राहता प्रत्यक्ष कृतीतून अनुभवायला मिळाले.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, चिन्हांचे वाटप, प्रचार आणि मतदारांशी संपर्क अशा सर्व टप्प्यांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

दरम्यान, प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच विद्यार्थ्यांनी परस्परांतील मतभेद बाजूला ठेवत एकमताने प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय घेतला. मतदानाची वेळ जवळ आलेली असतानाच सर्वानुमते उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निर्णयामुळे वेळ, खर्च आणि संभाव्य वाद टळले, तसेच शाळेत ऐक्याचा प्रेरणादायी संदेश गेला.

विविध जाती-धर्मातील विद्यार्थी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांचे सुंदर दर्शन घडले. शालेय जीवनातच संवाद, समन्वय आणि सहमतीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी कृतीतून दाखवून दिले.

विद्यार्थ्यांच्या या परिपक्व निर्णयाचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच फेजीवडे परिसरातील ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. भविष्यात जबाबदार आणि सजग नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.