Header Ads

कवलापूरमध्ये संतापजनक प्रकार! साडेपाच वर्षीय चिमुरडीशी अश्लील चाळे; आरोपीला पॉक्सोखाली अटक.

 कवलापूरमध्ये संतापजनक प्रकार! साडेपाच वर्षीय चिमुरडीशी अश्लील चाळे; आरोपीला पॉक्सोखाली अटक.

-------------------------------------

मिरज प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~~~

मिरज प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे अवघ्या पाच वर्षे सात महिने वयाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी मयूर प्रकाश तोडकर (वय ३२, रा. सिद्धेश्वर गल्ली, कवलापूर, ता. मिरज) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. पीडित बालिका घरासमोर खेळत असताना तिची नातेवाईक महिला घराबाहेर कपडे वाळत घालत होती. त्याचवेळी संशयित तेथे आला आणि त्याने बालिकेला ओढून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर बालिकेच्या आजीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि बुधवारी रात्री संशयिताला अटक केली.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे कवलापूर परिसरात संतापाचे वातावरण असून बालकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.