सह्याद्रीचा जलप्रपात दणाणला! राऊतवाडी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची पावले पुन्हा राधानगरीकडे
सह्याद्रीचा जलप्रपात दणाणला! राऊतवाडी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची पावले पुन्हा राधानगरीकडे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राऊतवाडी धबधब्याने पुन्हा एकदा रौद्र-सुंदर रूप धारण केले आहे. धबधब्यासह परिसरातील अनेक लहान-मोठे धबधबेही प्रवाहित झाल्याने संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आणि राऊतवाडी परिसरात पावसाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून येत्या शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, धबधब्याचा पाण्याचा वेग वाढत असल्याने पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, धोकादायक ठिकाणी जाणे व पाण्यात उतरणे टाळावे, तसेच स्वच्छता राखून निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने राधानगरीच्या पावसाळी पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत.

No comments: