आनंदाची बातमी! 'राजमाता जिजाऊ'च्या ५ हायटेक एसटी बस रस्त्यावर; आता प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि आरामदायी...
आनंदाची बातमी! 'राजमाता जिजाऊ'च्या ५ हायटेक एसटी बस रस्त्यावर; आता प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि आरामदायी..
~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली आगारातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात टाटा कंपनीच्या 'राजमाता जिजाऊ' मालिकेतील पाच अत्याधुनिक एसटी बस दाखल झाल्या असून शनिवारी त्यांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या बस लवकरच कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावर धावणार असून हजारो प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चोंगुले, विभागीय लेखाधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
महेंद्र चंडाळे यांनी सांगितले की, प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास हेच महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असून नव्या बसांमुळे सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
यंत्र अभियंता सुकन्या साठे यांनी नव्या बसांमधील अत्याधुनिक सुविधांची माहिती देताना सांगितले की, या बसांमध्ये एलईडी मार्गफलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट, डिजिटल जाहिरात फलक, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि आपत्कालीन पॅनिक बटन यांसारख्या आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुविधायुक्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आगार प्रशासनाने प्रवाशांना नव्या 'राजमाता जिजाऊ' बससेवेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. सांगली आगारात दाखल झालेल्या या पाच हायटेक बसांमुळे एसटीच्या प्रवासाला आधुनिकतेची नवी दिशा मिळणार असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

No comments: