पेंडाखळेत काळाचा घाला! वाळलेल्या झाडाची फांदी डोक्यावर कोसळली; पॉवरट्रेलर चालकाचा दुर्दैवी मृत्यू
पेंडाखळेत काळाचा घाला! वाळलेल्या झाडाची फांदी डोक्यावर कोसळली; पॉवरट्रेलर चालकाचा दुर्दैवी मृत्यू
--------------------------शाहुवाडी तालुक्यातील पेंडाखळे येथे शनिवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. शेतातील काम आटोपून पॉवरट्रेलर बाहेर काढत असताना रस्त्यालगतच्या वाळलेल्या हेळा झाडाची मोठी फांदी चालकाच्या डोक्यावर कोसळल्याने त्यांचा जागीच गंभीर दुखापत होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवचामळा येथील सरदार पाटील यांच्या शेतात रोपलागणीपूर्वी चिखल करण्याचे काम वसंत बंडू कांडर हे आपल्या पॉवरट्रेलरद्वारे करत होते. काम पूर्ण करून ते दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी शेतातून बाहेर येत असताना रस्त्यालगतच्या वाळलेल्या हेळा झाडाची फांदी अचानक तुटून त्यांच्या डोक्यावर पडली. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित शेतकरी व नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना खासगी वाहनातून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे पेंडाखळे परिसरात शोककळा पसरली आहे. वसंत बंडू कांडर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments: