शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! आता रोज मिळणार टेट्रा पॅक दूध.
शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! आता रोज मिळणार टेट्रा पॅक दूध.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | अमरावतीप्रतिनिधी : पी. एन. देशमुख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राज्यभरातील शासकीय वस्तीगृह आणि शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आता त्यांना २०० मि.ली.चे दर्जेदार टेट्रा पॅक दूध नियमितपणे दिले जाणार आहे.
राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समितीने पराग मिल्क फूड आणि श्री वरणा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड या दोन संस्थांची दूध पुरवठ्यासाठी निवड केली आहे. दोन्ही संस्थांना प्रत्येकी ५० टक्के दूध पुरवठ्याचे कंत्राट मंजूर करण्यात आले असून समाजकल्याण आयुक्त, पुणे यांना तातडीने पुरवठा सुरू करण्याचे आदेश ३१ ऑगस्ट रोजी शासनाने जारी केले आहेत.
विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण दूध मिळावे यासाठी प्रति २०० मि.ली. टेट्रा पॅकचा दर २६.४० रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा दर पुढील तीन वर्षांसाठी कायम राहणार असून या कालावधीत पुरवठादारांना कोणतीही दरवाढ मिळणार नाही, अशी स्पष्ट अट शासनाने घातली आहे.
सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी या निर्णयाची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

No comments: