उंचगावात वीज बिल भरणा केंद्राची शिवसेनेची जोरदार मागणी; सप्टेंबरअखेर केंद्र सुरू करण्याचे महावितरणचे आश्वासन
उंचगावात वीज बिल भरणा केंद्राची शिवसेनेची जोरदार मागणी; सप्टेंबरअखेर केंद्र सुरू करण्याचे महावितरणचे आश्वासन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~उंचगाव, ता. करवीर : उंचगाव आणि परिसरातील हजारो वीज ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी उंचगावात स्वतंत्र वीज बिल भरणा केंद्र सुरू करावे, अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली. केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
उंचगाव, सरनोबतवाडी आणि परिसराची लोकसंख्या सुमारे ५० ते ६० हजार, तर वीज ग्राहकांची संख्या तब्बल १५ ते १६ हजार आहे. मात्र, उंचगावात स्वतंत्र वीज बिल भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांना बिल भरण्यासाठी गडमुडशिंगी येथे जावे लागते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक तसेच ऑनलाइन पद्धतीने बिल भरू न शकणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.
या प्रश्नाबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी आणि सहाय्यक अभियंता संदीप काकडे यांना निवेदन दिले. करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी ग्राहकांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली. तर पोपट दांगट यांनी हजारो ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी दुसऱ्या गावात का जावे लागते, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उंचगावात वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत उंचगाव कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची वीज बिले अधिकारी ऑनलाइन स्वीकारतील आणि कोणत्याही ग्राहकाची गैरसोय होऊ दिली जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

No comments: