रेदाळ किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे प्रमुख मान्यवरांचा सत्कार
रेदाळ किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे प्रमुख मान्यवरांचा सत्कार.
रेंदाळ प्रतिनिधी सचिन कुंभार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
रेंदाळ : रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी रेंदाळ-हुपरी पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, हुपरी मंडल कृषी अधिकारी सौ. दिपाली पवार तसेच रेंदाळ ग्राम महसूल अधिकारी सौ. हेमलता शेडशाळे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक सुरेश आण्णा इंग्रोळे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले, तर स्वागताध्यक्ष शितल बिंदगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शब्बीर मोमीन व डी. एम. पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सत्काराला उत्तर देताना रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. व्यापाऱ्यांच्या विविध उपक्रमांना आपण सदैव खंबीरपणे पाठिंबा देऊ, असे त्यांनी सांगितले.मंडल कृषी अधिकारी सौ. दिपाली पवार यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ग्राम महसूल अधिकारी सौ. हेमलता शेडशाळे यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष शितल बिंदगे, उपाध्यक्ष सागर कोळी व सुरेश आण्णा इंग्रोळे यांच्या हस्ते करण्यात आला. मंडल कृषी अधिकारी सौ. दिपाली पवार तसेच ग्राम महसूल अधिकारी सौ. हेमलता शेडशाळे यांचा सत्कार असोसिएशनच्या संचालिका सौ. अलका अनिल रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुरेश आण्णा इंग्रोळे यांनी आपल्या मनोगतात रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. रक्षाबंधनानंतर दोन महिला भगिनींचा सन्मान करून त्यांना समाजातील सर्व भावांनी प्रोत्साहन व आशीर्वाद देणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना इंग्रोळे यांनी हाके कुटुंबीयांकडून निमशिरगाव येथील वृद्धाश्रमाला वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. तसेच हाके साहेबांनी संसाराची जबाबदारी सांभाळत पत्नीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि नुकतेच त्यांच्या पत्नीने एल.एल.बी. पदवी उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे चौथी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाच्या काळात हाके यांनी किराणा व्यवसाय केल्याचा उल्लेख होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास रेंदाळच्या कृषी सखी आरती पोवार, कोतवाल खानविलकर मॅडम, सामाजिक कार्यकर्ते परशुराम हवालदार तसेच असोसिएशनचे संचालक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील यांनी केले, तर आभार सागर कोळी यांनी मानले. उत्स्फूर्त प्रतिसादात व मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments: