शाहूपुरी पोलिसांनी हद्दपारी आदेशाचा भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडले; गुन्हा दाखल.
शाहूपुरी पोलिसांनी हद्दपारी आदेशाचा भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडले; गुन्हा दाखल.
प्रतिनिधी: रहिम पिंजारी.
-----------------------------
कोल्हापूर:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.करण उर्फ पोळार्ड राजेश फाळके (वय २२ वर्षे, रा. ए.पी. स्कूल कंपाऊंड शेजारी, कनाननगर, कोल्हापूर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सर यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर उपविभागात एकूण २२१ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले होते. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ५० सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात या हद्दपार व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके यांनी गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या.शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक कनाननगर परिसरात गस्त घालत असताना, हद्दपार केलेला आरोपी करण उर्फ पोळार्ड राजेश फाळके हा कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यात अनाधिकृतपणे प्रवेश करून फिरत असल्याचे आढळून आले. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं ७०२/२०२६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके व त्यांच्या पथकाने केली आहे.

No comments: