कोल्हापुरात घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; पार्सल डिलिव्हरी बॉयला अटक, १६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापुरात घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; पार्सल डिलिव्हरी बॉयला अटक, १६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त.
प्रतिनिधी:रहिम पिंजारी
कोल्हापूर:घरपोच ऑनलाईन पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिजोरीतून सोन्याचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरात घडली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १६ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सोहेल समीर शेख (वय २८, रा. प्रगतीशील तरुण मंडळ जवळ, न्यू नाना पेठ, पुणे सिटी; सध्या रा. पिंटू मुल्ला यांच्या भाड्याच्या खोलीत, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभदा सुरेश मंडलिक (वय ६३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
काय घडली होती घटना?
फिर्यादी शुभदा मंडलिक यांचे घर उघडे असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. तिजोरीतून ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या आणि ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण १६ लाख २६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास
गुन्हा दाखल होताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी ऑनलाईन पार्सल डिलिव्हरीचे काम करणाऱ्या सोहेल शेख यानेच ही चोरी केली असून तो दागिने विकण्यासाठी अंबाई टँक परिसरात येणार असल्याचे समजले.
पोलिसांनी तात्काळ अंबाई टँक परिसरात सापळा रचला. तेथे एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा मोपेडवरून येणाऱ्या सोहेल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे डिकीमध्ये रुमालात बांधलेले चोरीचे सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
• ६ तोळे २६० मिलिग्रॅम सोन्याच्या पाटल्या (किंमत ₹८,८८,०००/-)
• ५ तोळे ४६० मिलिग्रॅम सोन्याचे गंठण (किंमत ₹७,४०,०००/-)
• गुन्ह्यात वापरलेली पांढरी ॲक्टिव्हा मोपेड (किंमत ₹४०,०००/-)
• एकूण मुद्देमाल: ₹१६,६८,०००/-
आरोपीवर आधीच गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला आरोपी सोहेल शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्यावर घरफोडी (BNS ३०५-अ) आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही धडक कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव, आणि गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.

No comments: