३० वर्षांपासून फळ्यावर उमटता आहेत गावातील घडामोडी , मरळीचे संभाजी दांगट म्हणजे चालती बोलती डायरी
३० वर्षांपासून फळ्यावर उमटता आहेत गावातील घडामोडी , मरळीचे संभाजी दांगट म्हणजे चालती बोलती डायरी
वयाच्या ६५ व्या वर्षीही फलक लेखनाचा वसा कायम ; १९९६ पासून अविरत सेवा.
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
गावात नेमकं काय घडतंय? ग्रामसभा कधी आहे? शासकीय आदेश काय आला आहे? सण-उत्सवाचे नियोजन काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मरळीकरांना कुठेही जावे लागत नाही. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला काळा फळा आणि त्यावर सुंदर अक्षरात उमटणारी संभाजी दांगट यांची अक्षरे हेच मरळीकरांचे माहितीचे हक्काचे केंद्र बनले आहे.
मरळी (ता. पन्हाळा) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी दांगट (वय ६५) हे गेली ३० वर्षे म्हणजेच १९९६ पासून गावातील फलक लेखनाचे काम निस्वार्थपणे करत आहेत. गावातील प्रत्येक लहान-मोठी घडामोड, शासकीय निर्णय, ग्रामस्थांची बैठक, सण-उत्सवाची माहिती ते आपल्या सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिहून गावकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.
गावात कोणता कार्यक्रम होणार आहे, ग्रामस्थांची बैठक कधी आहे, कोणता शासकीय आदेश आला आहे, सण-उत्सवाचे नियोजन काय आहे किंवा एखादी महत्वाची सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे, अशा प्रत्येक वेळी सूचना फलकावर नोंद करण्याचे काम दांगट निष्ठेने करतात. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या कार्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग अधोरेखित होतो.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, व्हॉट्सॲप आणि समाजमाध्यमातून माहितीचा प्रसार होत असला, तरी गावातील सूचना फलकाचे महत्व आजही कायम आहे. विशेषतः समाजमाध्यमाचा वापर न करणाऱ्या नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी हे माध्यम आजही उपयुक्त ठरते.
वयाच्या ६५ व्या वर्षीही १९९६ पासून जपलेला फलक लेखनाचा वारसा संभाजी दांगट यांनी कायम ठेवला आहे. कोणताही गाजावाजा न करता गावातील सार्वजनिक जीवनाची नोंद जपण्याचे त्यांचे काम हे निस्वार्थ सेवेचे उदाहरण आहे. त्यांच्या लेखणीतून फलकावर उमटणारी प्रत्येक नोंद गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाची माहिती पुढे पोहोचविण्याचे काम करते.
गावाच्या दैनंदिन घडामोडींची नोंद ठेवणारे, नागरिकांना माहितीशी जोडणारे, सामाजिक उपक्रमांना हातभार लावणारे संभाजी दांगट यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणूनच मरळीच्या फलकावर उमटणारी अक्षरे म्हणजे गावाच्या वाटचालीची नोंद, तर ती अक्षरे लिहिणारे संभाजी दांगट म्हणजे गावाची सामूहिक जीवनाची ‘चालती-बोलती डायरी’ ठरले आहेत.

No comments: