Header Ads

तिवसा तहसीलमध्ये १६ लाखांचा अनुदान घोटाळा! ३२ बोगस शेतकरी दाखवून सरकारी निधीवर डल्ला.

 तिवसा तहसीलमध्ये १६ लाखांचा अनुदान घोटाळा! ३२ बोगस शेतकरी दाखवून सरकारी निधीवर डल्ला

८ लाभार्थी बेपत्ता; वरिष्ठ लिपिकावर संशयाची सुई, महसूल विभागात खळबळ!


पी. एन. देशमुख | जिल्हा प्रतिनिधी, अमरावती

तिवसा : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आलेल्या शासकीय अनुदानावरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार तिवसा तहसील कार्यालयात उघडकीस आला आहे. ३२ बोगस लाभार्थी दाखवून तब्बल १६ लाख रुपयांचे अनुदान वितरित केल्याचा प्राथमिक अहवाल समोर आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी पीक नुकसान भरपाईसाठी आलेल्या निधीचे वाटप केल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम शासनाकडे परत जमा करणे अपेक्षित होते. मात्र, या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. वरिष्ठ लिपिक निलेश कोकाटे यांच्यावर दोन गावांतील ३२ शेतकरी नसलेल्या व्यक्तींची बनावट कागदपत्रे व बँक खात्यांची माहिती वापरून अनुदान लाटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तहसीलदार मयूर बोरसे यांनी मे २०२६ मध्ये या प्रकरणाचा छडा लावल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जुलैपासून चौकशी सुरू असून, ३२ बोगस लाभार्थ्यांच्या नावाने निधी काढल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे यादीतील आठ लाभार्थ्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचे पत्तेही संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांकडून रकमेची वसुली सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाचे दोन सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

दरम्यान, संशयित वरिष्ठ लिपिकाची मे महिन्यानंतर अचलपूर येथे बदली झाली असली, तरी या प्रकरणातील जबाबदारी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असताना बोगस लाभार्थ्यांच्या नावावर लाखोंचे अनुदान कसे वितरित झाले? या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.