कुपवाडमध्ये भरदिवसा घरफोडी! सोन्या-चांदीचे दागिने अन् रोकड मिळून २.८९ हाजाराचा ऐवज लंपास
कुपवाडमध्ये भरदिवसा घरफोडी! सोन्या-चांदीचे दागिने अन् रोकड मिळून २.८९ हाजाराचा ऐवज लंपास
बेडरूमच्या उघड्या दरवाजातून प्रवेश; कपाटातील दागिने चोरट्यांनी केले गायब, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कुपवाड | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील खारी मळा परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ८९ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी शीतल शामराव कोथळे (वय ४३, रा. राणा प्रताप चौक, खारी मळा, कुपवाड) यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूमच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
काय-काय लंपास केले?
चोरट्याने सोन्याचे मिनी गंठण, सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, कानातील दागिने, चांदीचा चोंडा आणि १२ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २ लाख ८९ हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कोळी करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments: