ढोल-ताशांच्या गजरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची भव्य मिरवणूक उत्साहात साजरी.
ढोल-ताशांच्या गजरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची भव्य मिरवणूक उत्साहात साजरी.
हजारो नागरिकांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; डीजेमुक्त मिरवणुकीतून सामाजिक एकतेचा संदेश.
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
उमरखेड : शहरातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीत हजारो बौद्ध बांधव आणि नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता.
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात
उत्सवाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महान सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते कीर्ती बोधी, माजी सैनिक शंकरराव दिवेकर, माजी नगरसेविका हिराबाई दिवेकर आणि रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांनी पंचशील ध्वजगीत सादर केले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून भगवान बुद्धांच्या विचारांना अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रमात बौद्ध संस्कृती, समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
डीजेमुक्त मिरवणुकीत हजारोंचा सहभाग
सायंकाळी ६ वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेमुक्त ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारो बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जय भीम आणि नमो बुद्धायच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हजारो नागरिकांनी अभिवादन केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मिरवणुकीतून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अवघ्या आठ दिवसांत उत्सवाची जय्यत तयारी
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीने अवघ्या आठ दिवसांत जय्यत तयारी केली होती. उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, उपाध्यक्ष कुमार केंद्रेकर, सचिव आकाश श्रवले, कोषाध्यक्ष संतोष इंगोले,गौतम दिवेकर कार्याध्यक्ष शुद्धोधन दिवेकर व तुषार पाईकराव, तसेच संघटक अजय दिवेकर, अंकुश दिवेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी उमरखेड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे विचार आणि सामाजिक एकतेची भावना जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न या उत्सवातून करण्यात आला.

No comments: