Header Ads

गांधीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद! बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयात कुत्री सोडणार; शिवसेनेचा इशारा...

 गांधीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद! बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयात कुत्री सोडणार; शिवसेनेचा इशारा

कुत्रे चावण्याच्या वाढत्या घटना गंभीर; पाणी वितरणातील असमानतेवरही शिवसेना आक्रमक.



गांधीनगर | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

गांधीनगरमधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांसह व्यापारी आणि बाहेरगावाहून येणारे ग्राहक त्रस्त झाले आहेत. कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीरच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयात भटकी कुत्री सोडण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड व्यापार पेठ असून येथे मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. दररोज खरेदीसाठी हजारो ग्राहकांची वर्दळ असते. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गांधीनगर वसाहत रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर लस घेण्यासाठी दररोज तीन ते चार जण येत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. कचरा डेपोमुळेही भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पाणी वितरणातील असमानतेवरही नाराजी

गांधीनगरमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडेही शिवसेनेने ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले. काही गल्ल्यांमध्ये कमी, तर काही ठिकाणी जास्त पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी मांडत सर्व भागांत समान पाणीवाटप करण्याची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केली.

सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच संदीप पाटोळे आणि ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांना निवेदन दिले. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तसेच पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात येतील आणि सर्वांना समान पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आल्याचे शिवसेनेने सांगितले.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ग्राहक सेना तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, विभागप्रमुख दीपक पोपटाणी, वीरेंद्र भोपळे, विनोद रोहिडा यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि समान पाणीवाटपाच्या मागण्यांवर आता ग्रामपंचायत काय ठोस पावले उचलणार, याकडे गांधीनगरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.